जळगाव-फरजाज सैयद | जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे नाशिक सारख्या महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊन त्यांना पक्षाने उत्तर महाराष्ट्रात संपादन केलेल्या विजयाचे गिफ्ट दिल्याचे मानले जात आहे.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील पालकमंत्रीपदांचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. यात राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये महायुतीतील महत्वाच्या नेत्यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे. यात नाशिकची धुरा ही राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे आलेली आहे. त्यांनी आधी देखील नाशिकचे पालकमंत्रीपद हे अतिशय सक्षमपणे सांभाळले होते. त्यांनी भाजपला स्थानिक पातळीवर अतिशय उत्तम असे यश मिळवून दिले होते. तर अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशात देखील त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा होता.
दरम्यान, यंदा जळगाव जिल्ह्यात देखील पालकमंत्रीपदाबाबत चुरस निर्माण झाली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी गिरीशभाऊ अथवा ना. संजय सावकारे यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. तथापि, पक्षाने जळगावच्या ऐवजी गिरीशभाऊ यांना नाशिकची मोठी जबाबदारी देऊन त्यांच्या कार्याचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे.
नाशिक येथे भाजपच्या सोबतीला शिवसेना व राष्ट्रवादीतील मातब्बर नेत्यांनी पालकमंत्रीपदाचे दावे केले असतांना ना. गिरीशभाऊ महाजन यांना येथील जबाबदारी मिळाली आहे. आगामी काळातील निवडणुकांसाठी पक्षाने त्यांना खास कामगिरी दिल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. अर्थात, त्यांच्यासाठी हे आव्हान देखील असणार आहे. नाशिकच्या जोडीला जळगाव जिल्ह्यात यश मिळवण्याची कामगिरी देखील त्यांना पूर्ण करावी लागेल. अर्थात, आपल्या संकटमोचक या प्रतिमेला जोपासत ते स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील उत्तर महाराष्ट्रात भाजपला दणदणीत यश मिळवून देतील असा आशावाद भाजपच्या समर्थकांना आहे.