घुसर्डीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; मकासह ठिबक जळून खाक

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या घुसर्डी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एकरभर मका व ठिबक जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी महावितरणने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, घुसर्डी शिवारातील चरणदास सुखदेव पाटील रा. होळ ता. पाचोरा यांचे गट नं. १०४, क्षेत्र १: ०७ गुंठे शेतातील मका कणसासहीत चारा व पूर्ण ठिंबक सहीत १ ते दिड लाखाचे नुकसान झाले आहे. दुपारी शेतातील तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून लागलेल्या आगीत ऐन काढणीवर आलेला संपूर्ण मका जळून राख झाले आहे. त्याबरोबरच शेतातील ठिंबकही पूर्णपणे जळाली आहे. शॉर्ट सर्किट मुळे आग लागून नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. ऐन तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

 

Protected Content