नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना शांतता काळात आणि सेवा क्षेत्रातील असाधारण कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘परम विशिष्ट सेवा पदका’ने आज, गुरुवारी गौरवण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रावत यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लष्करप्रमुख रावत यांच्यासह लष्कराच्या अन्य १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं. त्यात १५ लेफ्टनंट जनरल आणि तीन मेजर दर्जाचे अधिकारी आहेत. लष्कराच्या अन्य दोन अधिकाऱ्यांना किर्ती चक्र देण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे. २२ व्या राष्ट्रीय रायफल्सचे सोवर विजय कुमार यांना मरणोत्तर, तर जाट रेजिमेंटचे मेजर तुषार गौबा यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तर सीआरपीएफचे जवान प्रदीप कुमार पांडा आणि राजेंद्र कुमार नैन यांनाही (मरणोत्तर) किर्ती चक्र देण्यात येणार आहे. तर लष्कराच्या नऊ अधिकाऱ्यांना शौर्य चक्रनं सन्मानित करण्यात येणार आहे.