एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल वासियांसाठी पुस्तकांचा बगीचा वाचनाची आवड निर्माण करेल असा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एरंडोल शहरातील आनंद नगर येथील पालिकेच्या खुल्या भूखंडावर नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून व आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे साकारण्यात आलेल्या पुस्तकांच्या बागीच्याला भेट दिल्या प्रसंगी व्यक्त केला.
एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून शहरातील आनंद नगर येथील खुल्या भूखंडावर राज्यातील पहिलाच उपक्रम म्हणजे पुस्तकांचा बगीचा उभारला आहे. सदर बगीचा उभारण्याकामी आमदार चिमणराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. आमदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शहरात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून खुल्या भूखंडांवर सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
याच कार्याचा एक भाग म्हणुन शहरातील आनंद नगर येथील खुल्या भूखंडावर नगर पालिकेच्या वतीने सुंदर पुस्तकांचा बगीचा उभारला गेला आहे.या बगीच्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच भेट दिली व येथील पुस्तकांचे निरीक्षण केले,येथील वाचन कट्ट्याला भेट देऊन काही पुस्तकं वाचली, बगीच्या मधील असलेल्या भिंतीवरील लेखांचे वाचन केले तसेच सेल्फी पॉईंट वर मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या सोबत सेल्फी काढली. बगिच्यातील कवितेची भिंत, विविध भित्ती चित्रे यांची पाहणी करुन नगरपालिकेच्या या उपक्रमाची प्रशंसा केली.
यानंतर त्यांनी शहरातील नगर पालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला भेट दिली व याठिकाणी नगर पालिकेतर्फे तयार होणाऱ्या खताची प्रशंसा केली व प्लॅस्टिक बंदी बाबत जनजागृती व योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.याप्रसंगी एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे,तहसीलदार सुचिता चव्हाण व नगर पालिकेचे व महसूल विभागाचे अधिक व कर्मचारी उपस्थित होते.