


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात श्री गणेश चतुर्थीनिमित्त मोठ्या उत्साहात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. पाच दिवसांच्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणानंतर १८ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या गणपती बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेशोत्सवाच्या कालावधीत महाविद्यालयात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गणपती विसर्जनापूर्वी महाविद्यालयात विधिवत आरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीनंतर विद्यार्थ्यांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाविद्यालयात शाडू मातीचा गणपती तयार करण्याची स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविले. शाडू मातीचा गणपती स्पर्धेत कीर्ती बोरोले व ग्रुप यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शिवानी प्रजापती व ग्रुप यांनी द्वितीय, तर शुभांगी लोहार यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रांगोळी स्पर्धेत काजल सोनवणे यांनी प्रथम, नेहा पाटील यांनी द्वितीय, तर पूनम मोरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धांचे पर्यवेक्षक म्हणून डॉ. सरोज भोळे व प्रा. पूनम वाणी यांनी काम पाहिले.
पाच दिवसांच्या गणेशोत्सवानंतर १८ सप्टेंबर रोजी विसर्जनासाठी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढल्यानंतर मन्यारखेडा परिसरातील तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना विद्यार्थी आणि उपस्थितांच्या मनात भावनिक वातावरण निर्माण झाले. गणपती विसर्जनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गणेशोत्सवाचे नियोजन आणि आयोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रा. नकुल गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समितीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भक्तीभावासोबतच सांस्कृतिक सहभाग, सर्जनशीलता, पर्यावरणपूरक विचार आणि संघभावनेचा अनुभव मिळाला. विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले. उत्साह, आनंद आणि भावपूर्ण वातावरणात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पाच दिवसीय गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.



