Home क्राईम गोळीबार प्रकरणातील सराईत गुन्हेगारांची टोळी गावठी कट्ट्यासह जेरबंद

गोळीबार प्रकरणातील सराईत गुन्हेगारांची टोळी गावठी कट्ट्यासह जेरबंद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गुरूवारी झालेल्या गोळीबार प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत.

अधिक माहिती अशी की, महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. पिंप्राळा) हा मित्र भूषण अहिरे याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेंट जोसेफ शाळेजवळील मीनाताई ठाकरे मार्केट येथे आले होते. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याने आरोपींनी कोयते आणि गावठी कट्ट्यासह घटनास्थळी येऊन फिर्यादीवर गोळीबार केला. या गोळीबारात महेंद्र सपकाळे यांच्या कमरेखाली गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी अवघ्या काही दिवसात सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल भिका कोळी (पिस्तूलासह), अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धिरज उर्फ वैभव उर्फ गोलु कोळी, सागर अरुण भोई उर्फ जाडया भोल्या, नितेश मिलिंद जाधव आणि गिरिष किशोर घुगे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपी गिरिष घुगे याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. याशिवाय घटनास्थळावरून एक जिवंत काडतूस आणि दोन रिकामे काडतुसांचे खोल तसेच एक कोयता देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पोलिसांनी आरोपींचा मागील रेकॉर्ड तपासला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी विशाल कोळी याच्यावर जळगाव शहर आणि रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती. तसेच, आरोपी अक्षय धोबी याच्यावर ८ गुन्हे दाखल असून त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आरोपी नितेश जाधव याच्याविरुद्ध १५ गुन्हे दाखल असून त्याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदीप वाघ, पोउपनि प्रदिप बोरुडे आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे करत आहेत.


Protected Content

Play sound