मुंबई प्रतिनिधी । माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून गांधी शांतता यात्रेस आज प्रारंभ करण्यात आला आहे. दिल्लीतील राजघाटापर्यंत या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आजपासून मुंबईतून गांधी शांतता यात्रेस सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते दिल्लीतील राजघाटपर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शरद पवार, वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री ना. नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने जनतेची घोर निराशा केली आहे. नवीन कायदे आणून देशाच्या एकतेला धोका निर्माण केला आहे. केंद्र सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. हा शांतीपूर्ण संघर्ष आहे. समाजातील सर्व वर्गामध्ये एकता निर्माण करण्याची गरज आहे, असे शरद पवार यांनी यात्रेतील उपस्थितांना संबोधित करताना म्हटले.