जळगाव प्रतिनिधी । जातीयवादी राज्य सरकारला खाली खेचण्यासाठी जळगावातून अभिषेक पाटील यांच्यासारख्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष हाजी गफ्फार मलीक यांनी केले. ते आज आयोजित पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक होते. तर व्यासपीठावर उमेदवार अभिषेक पाटील, ज्येष्ठ नेते नामदेवराव चौधरी, कल्पना पाटील, ललीत बागूल आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी हाजी गफ्फार मलीक यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, विद्यमान सरकार हे दलीत आणि अल्पसंख्यांकांच्या विरोधी असून अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कोणत्याही प्रकारची कामे झालेली नाहीत. जळगावातही कोणत्याच प्रकारची कामे झाली नसून मतदारांनी अभिषेक पाटील यांच्यासारख्या युवा चेहर्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. तर अभिषेक पाटील यांनीही सत्ताधार्यांवर टीका करून निधर्मी विचारांना साथ देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.