गडचिरोली (वृत्तसंस्था) राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात नक्षलविरोधी पथकाचे १५ जवान शहीद झाले आहेत. या स्फोटाअगोदर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये काही काळ चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. शहीद जवानांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.
बुधवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. घटनास्थळी नक्षली आणि पोलिसांची चकमक सुरु आहे. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभुळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणला, यात वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. पहाटे वाहनांची जाळपोळ होण्याच्या घटनास्थळी एसडीपीओ शैलेश काळे गेले होते. तेथून त्यांनी या पथकाला तातडीने तिकडे पाचारण केले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले होते.