धानोरा, ता. चोपडा(प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते राजमल महाजन यांनी आपल्या शेतातील विहिर गावकऱ्यांना पाण्यासाठी मोफत उपलब्ध करुन दिल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याची मोठी सोय झाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, राजमल महाजन यांचे शेत गावालगतच आहे. या शेतात सध्या कांदा, केळी अशी पिके आहेत. तरीही त्यांनी आपली विहीर पाण्यासाठी खुली करुन दिली आहे. यामुळे इस्लामपुरा, माळीवाडा, पारधी वाडा, आंबेडकर नगर, चर्मकार वाडा तथा आजुबाजुच्या रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न तुर्त मिटलेला आहे. या विहीरीवरुन दिवस-रात्र महिला, लहान मुले-मुली, आबालवृद्ध पाणी भरण्यासाठी येत आहेत. यामूळे महाजन यांच्या या दातृत्वामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. यात त्यांना त्यांची मुले शैलेंद्र व विशाल यांची साथ लाभत आहे. यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते विलास सोनवणे, आवेश खान आदी उपस्थित होते.