मुंबई प्रतिनिधी । नवीन वर्षाच्या स्वागताला पार्टीसाठी टेकड्यांवर, वनक्षेत्रात किंवा गडकिल्ल्यांवर जाणाऱ्या तळीरामांवर वन विभागाने बंदी घालण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनीच काही किल्ल्यांवर ‘बंदी’चे शस्त्र उगारले आहे. ‘नववर्षाच्या पूर्वसंध्येला हरिश्चंद्रगड, माहुली, प्रबळमाची आदी किल्ले बंद करण्यात आले आहे. अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल, रिसॉर्टमध्ये जाण्याऐवजी जंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये तंबू ठोकून कोणत्याही बंधनाशिवाय रात्रभर धांगडधिंगा घालण्याची मानसिकता वाढते आहे. यात दारू पार्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. दोन-तीन वर्षांपासून अनेक इव्हेंट कंपन्यांकडून गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी, मोकळ्या माळरानांवर ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. यासाठी दुर्लक्षित किल्ल्यांसोबत ठराविक प्रसिद्ध किल्ल्यांना पसंती दिली जात असून सदर ठिकाणी पार्ट्या करून या पर्यटकांनी कचरा आणि दारूच्या बाटल्या फेकल्याचे याआधी आढळून आले होते. या प्रकारामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होत असल्याचे ग्रामस्थ, किल्लेप्रेमींचे म्हणणे आहे. मागील काही वर्षांत गडकिल्ल्यांवर दारू पार्टी केल्याबद्दल अनेक तळीरामांना ग्रामस्थांसह गडप्रेमी तरुणांनी फटकावल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. यावरून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी आधीच बंदी घालणे उत्तम असे अनेकांचे म्हणणे आहे.
गतवर्षी वन विभागाकडून गडकिल्ल्यांसह विविध ठिकाणी मुक्कामास बंदी घालण्यात आली होती. यामध्ये सिंहगड, लोहगड, विसापूर, राजमाची, शिवनेरी, पुरंदर, राजगड, तोरणा, तुंग-तिकोना या किल्ल्यांसह मयूरेश्वर अभयारण्य, भीमाशंकर, ताम्हिणी तसेच मुळशी, पानशेत या वनक्षेत्रांचा समावेश होता. यंदा ३१ डिसेंबर तोंडावर येऊन ठेपला असला तरी अद्याप शासनाकडून मुक्काम बंदीबाबत कुठलाही निर्णय जाहीर झालेला नाही.