भुयारी गटारी व रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर; आ. किशोर पाटलांचा पाठपुरावा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील पाणीपुरवठा,भुयारी गटार आणि रस्त्यांच्या विकास कामांसंदर्भात काही दिवसांपासुन विरोधकांकडुन टिका सुरू असुन या टिकेला मी विकासाने उत्तर देत आहे. आगामी किमान २५ वर्षा पर्यंत शहरातील मुलभुत सुविधांवर विरोधकांना बोलायला संधीच मिळणार नाही. या सर्व मुलभुत गरजांवर २२२ कोटी रूपयांचा निधी शासनाकडुन उपलब्ध झाला असुन लवकरच या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषद घेउन दिली.

आमदार किशोर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी मुख्याधिकारी मंगेश देवरे, बाजार समीती सभापती गणेश पाटील, रावसाहेब पाटील,एम. एस. पी. बिल्डकॉनचे संचालक मनोज पाटील, संजय गोहिल यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माहीती देतांना आमदार किशोर पाटील म्हणाले की, गेल्या ५ वर्षात शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार वाढलेला आहे‌. यामुळे वाढीव वस्तीला पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. भुयारी गटारीचे काम पुर्ण न झाल्यामुळे रहदारीच्या काही रस्तांची दुरावस्था झालेली होती. पण आता या सर्व समस्या दुर होणार असुन ६० कोटी रूपयांची नविन पाणी पुरवठा योजना मंजुर करून आणली आहे. या योजने अंतर्गत फिल्टेशन प्लॅंट, गिरणा पंपिंगवरून मोठी पाईप लाईनचे काम केले जाणार आहे. शहराचा वाढीव विस्तार पाहता ५८ कोटी रूपयांची भुयारी गटारीसाठी मंजुर करण्यात आले असुन शहरातील वाढीव वस्तींचेही काम यात पुर्ण होणार आहे. भुयारी गटारीचे काम करत असतांना शहरातील अनेक काॅलन्यांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने रेल्वे लाईनच्या भडगाव रोड कडील भागातील रस्त्यांना १०४ कोटी रूपयांचा निधीला मंजुरी मिळाली असुन रस्त्यांचीही समस्या आता सुटणार आहे. या विकास कामांमुळे येणारे २५ वर्षात पाणीपुरवठा, रस्ते व भुमिगत गटारीच्या समस्या उद्भवणार नाहीत.

मागील काळात शहरातील सर्वच खुल्या भुखंडांचा विकास करण्याचे काम हाती घेतले होते. या कामात मोठ्या भुखंडांना निधी अपुर्ण पडल्याने कामे अपुर्ण होती. यासाठी देखील १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला असुन सर्व खुल्या भुखंडाची कामे पुर्ण होतील. शहरातील राम मंदिराला जाण्यासाठी जैन पाठशाळेच्या बाजुने जाणार्‍या रस्त्यावर अडीच कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला असुन या मार्गावरून लवकरच शहरवासीयांना राम मंदिराच्या दर्शनाचा लाभ घेता येईल अशीही माहीती आ. पाटील यांनी दिली. शहर विकासाच्या या कामांमध्ये एम. एस. पी. बिल्डकाॅनचे योगदान मोठ्या प्रमाणात राहणार असुन विकास कामात आजपर्यंत त्यांनी दिलेल्या गुणवत्तेनुसार त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आल्याचेही आमदारांनी यावेळी सांगितले.

Protected Content