जुवार्डी-बहाळ रस्त्यासाठी निधी मिळवून देणार – खा. उन्मेष पाटील

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जुवार्डी येथिल ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषण स्थळी खा. उन्मेष पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून वार्डी बहाळ रस्त्याविषयी बोलताना ताबडतोब जिल्हा नियोजन समितीकडून रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये निधी मिळवून देण्यासाठी पत्र देणार असल्याचे खा. उन्मेष पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले. 

ग्रामस्थांनी जुवार्डी उपकेंद्रावर नियुक्त असलेला आरोग्य सेवक मागील चार वर्षांपासून अनधिकृत रित्या गैरहजर असल्यामुळे उपकेंद्राला संलग्नित असलेली जुवार्डी, पथराड, आडळसे ही गावे आरोग्य सेवेपासून वंचित रहात असल्याचे तसेच कोरोना लसीकरणाचे प्रमाणही अत्यल्प असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. खा. उन्मेष पाटील ह्यानी तक्रारीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी व जिप चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून जुवार्डी उपकेंद्रासाठी डॉक्टर व आरोग्य सेवक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. खा. उन्मेष पाटील यांनी उपोषण स्थळा वरूनच मागण्या संदर्भात वनक्षेत्रपाल व उपवनसंरक्षक ह्यांच्याशी फोनवरून संपर्क करून वनविभागाच्या संबधित समस्या सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. अंगणवाडी बांधकामा संदर्भात बाल विकास अधिकारी राऊत ह्यांच्याशी चर्चा करून अंगणवाडी बांधकामाचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले. जुवार्डी बहाळ रस्त्याविषयी बोलताना ताबडतोब जिल्हा नियोजन समितीकडून रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये निधी मिळवून देण्यासाठी पत्र देणार असल्याचे खा. उन्मेष पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले. 

याप्रसंगी जवळपास एक तास प्रदीर्घ चर्चा करून मार्गदर्शन करताना खा. उन्मेष पाटील ह्यानी जलजीवन मिशन, मनरेगा ह्या विषयी ग्रामस्थांना माहिती दिली व ‘गावाचा विकास’ आपल्याच हातात असून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. ह्याप्रसंगी सरपंच पती गोरख ठाकरे व मोठया प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. उपोषण स्थळी दुसऱ्या दिवशी भडगाव पंचायत माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. सरपंच पती गोरख ठाकरे, उपसरपंच पी ए पाटील, उपोषणकर्ते ह्यानी जुवार्डी गावाला भेट दिल्याबद्दल खा. उन्मेष पाटील यांचे आभार मानले.

 

Protected Content