भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार झालेल्या संशयित आरोपीला बाजारपेठ पोलीसांनी अष्टभुजा चौकातून अटक केल्याची कारवाई रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात अटकेची नोंद घेण्यात आली. शिवम जगदीश पथरोड रा. वाल्मिक नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील अष्टभुजा चौकात दोन जणांनी ३० हजार रूपयांची रोकडसह मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २८ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एकाला अटक करण्यात आली होती तर दुसरा शिवम पथरोड हा फरार झाला होता. दरम्यान शिवम हा अष्टभुजा चौकात आला असल्याची गोपनिय माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश चौधरी यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे व पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीसांनी रविवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत संशयित आरोपी शिवम पथरोड याला अटक केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोउपनिरी मंगेश जाधव करीत आहे.