पाचोऱ्यात सर्वच पक्षांमधील दिग्गजांकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी

pachora vartapatra

राजकीय वार्तापत्र : गणेश शिंदे

पाचोरा | विधानसभा निवडणुकीला अद्याप ४० दिवस ते एक महिन्याचा अवधी असताना पाचोरा- भडगाव तालुक्यात मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. घराणेशाहीचा बिमोड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून तालुका राजकारणात हस्तक्षेप सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत पाचोरा-भडगाव तालुक्यांचा ‘भावी आमदार’ कोण राहणार ? यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तालुक्यात निवडणुकीच्या रणधुमाळीने आतापासूनच वेग घेतला आहे.

 

पाचोरा-भडगाव मतदार संघात विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासमोर अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी चालवली आहे. सध्यातरी आ.पाटील यांनी मतदार संघातील गावांमध्ये लहान-मोठी विकासकामे करून आघाडी मिळवली आहे. त्यांची शिस्तबद्ध वर्तणूक असलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी ओळख निर्माण झाली असून येथून भावी आमदार म्हणून त्यांचीच दावेदारी प्रबळ मानली जात आहे. सध्या मात्र, त्यांचे संघटनात्मक जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. भाजपचे युवा नेतूत्व म्हणून अमोल शिंदे यांनी तालुक्यात सतत जनसंपर्क राखला असून संघटनात्मक बांधिलकी जोपासली आहे. तरुणांचे ते नेते आहेत, अलिकडे त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तालुक्याचे भावी आमदार अमोल शिंदे असणार, अशा घोषणा दिल्याने त्यांची महत्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे.

आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेनेकडून आमदार पाटील यांचे नाव निश्चित असून राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार दिलीप वाघ हे ही उमेदवार म्हणून निश्चित आहेत. दरम्यान, राज्यात भाजप-शिवसेना युतीचा वाद सुरू असून युती झाली नाहीच तर भाजपाकडून अमोल शिंदे यांच्याऐवजी सध्याचे जि.प. सदस्य मधुकर काटे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. भाजपची उमेदवारी मधुकर काटे यांना मिळाली तर अशावेळी अमोल शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. येथे भाजपत आतापासूनच गटबाजी दिसून येत आहे. पाचोरा तालुक्यात भाजपला सध्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या पडतीच्या काळात ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला नाही आणि जनसंपर्क टिकवून संघटनात्मक बांधिलकी जपली,
त्यांनाच या गटबाजीमुळे फटका बसला आहे.

तालुक्यात भाजपात एकसंघता नसल्याने वरिष्ठांकडून भाजपला ऊर्जितावस्था आणण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांनाच भाजपची उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण पाचोरा-भडगाव मतदारसंघात निवडणूक दुहेरी असो की चौरंगी मात्र खरी टक्कर विद्यमान आ.पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिलीप वाघ याच्यातच राहणार आहे. वाघ यांच्याकडून प्रचाराचा मुद्दा म्हणजे आ. पाटील यांनी केलेल्या हजार कोटी रुपयांच्या विकास कामात कुठलेही काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेले नाही, यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून दिग्गज इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून कोणाची युती किंवा आघाडी होते, ती किती टिकते, कोण बंडखोरी करतो, कोण माघार घेतो, कोण पक्षांतर करतो, अशा सगळ्या जर-तरच्या घडामोडींनंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Protected Content