Home आरोग्य वराडसीममध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात ; ३६९ नागरिकांची तपासणी

वराडसीममध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात ; ३६९ नागरिकांची तपासणी

0
205


वराडसीम-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  वराडसीम गावात सामाजिक बांधिलकी जोपासत महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आणि झुंजार लेवा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ सप्टेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रम राबवण्यात येत असल्याने या शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ३६९ नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, रक्तदाब (BP), मधुमेह (साखर तपासणी), ईसीजी (कार्डिओग्राम) यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. याशिवाय, गरजू रुग्णांना मोफत औषधांचं वितरण करण्यात आलं. शिबिरासाठी भुसावळ येथील सुप्रसिद्ध श्री हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व नेत्रम हॉस्पिटलचे डॉक्टर्स डॉ. मेश्राम आणि डॉ. मनीष रगडे यांनी वैद्यकीय सेवा दिली. त्यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले.

शिबिराची सुरुवात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. यावेळी गावातील नागरिकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर सर्व डॉक्टरांचे व मान्यवरांचे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ आणि वराडसीम ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष तपासणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

या उपक्रमामध्ये महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे खान्देश विभाग संघटक विनीत पाटील (हबर्डिकर), महासंघाचे पदाधिकारी धीरज बऱ्हाटे, वराडसीम गाव प्रमुख पराग भारंबे, अनिकेत ढाके, सागर काळे, त्रृषल खाचणे, ज्ञानराज काळे, दीपक वाणी, गौरव पाचपांडे, जयेश भारंबे यांच्यासह झुंजार लेवा ग्रुप व इतर कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळेच शिबिर यशस्वीपणे पार पडले.


Protected Content

Play sound