अमळनेरात उद्या भाजयुमोतर्फे मोफत ई-श्रम नोंदणी अभियान

अमळनेर प्रतिनिधी । भाजपाचे दिवंगत नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंती निमित्ताने आज दि.22 डिसेंबर रोजी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोफत ई-श्रम नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली व भाजयुमो च्या प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व शहर भाजयुमोने हे अभियान आयोजित केले असून हे नोंदणी अभियान उद्या दि 22 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेदरम्यान धुळे रोडवरील बाजार समिती समोरील स्व.उदय वाघ यांच्या स्मारकस्थळी हे अभियान राबविले जाणार आहे.सदर नोंदणीसाठी संबधित कामगार बंधूनी आधारकार्ड, बँक पासबुक व मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे. स्व.उदय वाघ यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कामगार बांधवांच्या हितासाठी नेहमीच योगदान दिले असून शासनाच्या माध्यमातून कामगार बांधवाना जास्तीतजास्त योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत,यामुळेच भाजयुमो ने त्यांना श्रद्धांजली म्हणून कामगार हिताचे हे अभियान आयोजित केले आहे.

ई-श्रम ही ही केंद्र शासनाची योजना असून यामाध्यमातून सीएससी ई-श्रम वर 38 कोटी संघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे,असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस देखील यातून तयार केला जाणार आहे.

श्रमिक कार्डचे हे आहेत फायदे

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे,सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.हे कार्ड तयार केल्यास सरकार असंघटित कामगारांना एक वर्षासाठी विमा मोफत देणार आहे,तसेच सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होणार असून असंघटित कामगारांसाठी सरकार अनेक योजना व संधी उपलब्ध करण्याच्या विचाराधीन आहे.

कोण बनवू शकते ई-श्रमिक कार्ड

घरकाम करणाऱ्या महिला,रस्त्यावरील विक्रेते,दुग्ध व्यावसायिक शेतकरी,ऑटो चालक, मॅकेनिक, शिलाई मशीन कामगार, न्हावी कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सुतार, पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशीयन, ब्युटी पार्लर, हॉटेल चालक, प्रिंटिंग व्यवसायिक, भाजी विक्रते, लोहार, सुरक्षा कर्मचारी, वीटभट्टी कामगार, लेदर कामगार, फळ विक्रेता, बचतगट कामगार, हातगाडी कामगार, वृत्तपत्र विक्रेते, विडी कामगार, सेन्ट्रीग कामगार, बांधकाम कामगार, पशु पालक, लघु शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, सॉमील कामगार, मोठे कामगार, विणकर, लेबलिंग व पॅकिंग करणारे.

तरी वरील क्षेत्रातील सर्व कामगार बंधूनी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी भाजयुमो च्या या अभियानात मोफत ई-श्रम नोंदणी अवश्य करून घ्यावी असे आवाहन अमळनेर तालुका व शहर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Protected Content