पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लासगाव ता.पाचोरा येथे सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेकडून शेतकऱ्यांना कीड रोगबाबत माहिती देत कीड रोग सर्वेक्षण साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी लासगावचे माजी सरपंच गोपाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र तायडे व मार्केट कमिटीचे प्रशासक डी. के. पाटील, प्रगतशील शेतकरी प्रेमराज पाटील यांची उपस्थिती होती.
सामनेर येथील सर्वोदय बहुउद्देशिय संस्था सेवाभावी उपक्रमाचे माध्यमातुन नेहमीच पुढाकार घेऊन विविध क्षेत्रात सहयोगी भूमिका साकारत असते. शेतकऱ्यांसाठी सुद्धा संस्थेचे नेहमी विधायक काम अविरतपणे सुरू आहे.
आजच्या परिस्थितीत शेती हा अतिशय खडतर विषय झाला असून बळीराजाला नानाविध समस्यांना या व्यवसायात सामोरे जावे लागते. पेरेल ते उगवेल काय, उगवेल ते पिकेल काय, पिकेल ते विकेल काय आणि विकेल त्याला रास्त भाव मिळेल काय ? अशा अडचणीचा डोंगर सदासर्वदा बळीराजा समोर उभाच ठाकलेला असतो. बरेचदा कीडरोगाच्या प्रादुर्भावाने हाताशी आलेले पीक किडरोगाचे भस्म झाल्याने उत्पन्नात कमालीची घट शेतकरी वर्गाला सहन करावी लागते. याचे मूळ कारण म्हणजे कीडरोगांचा प्रादुर्भाव. वेळीच न समजल्याने तो वाढत जातो त्यामुळे वेळ निघून गेल्यानंतर अमाफ खर्च करूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे वेळोवेळी शेतकरी वर्गात याबाबतीत सजगता निर्माण व्हावी. यासाठी सर्वोदय संस्थेचा पुढाकार असतो.
याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या माध्यमातून लासगाव येथे शेतकऱ्यांना किडरोग सर्वेक्षणाविषयी संस्थेचे कृषितज्ञ डी. एस. पाटील यांनी माहिती देत सर्वेक्षण साहित्याचे प्रात्यक्षिक करून दाखवत किडरोगाचे विविध अवस्थामधून मार्गक्रमण होत असतांना त्याचे पिकांवर होणारे दुष्परिणाम प्रत्यक्ष क्षेत्रावर दाखवले. पिकावर होणाऱ्या किडरोगाचे आक्रमण सर्वेक्षण साहित्याचे आधारे नेहमी न्याहाळून घेत त्यावर आधारित उपाय योजावेत असे सांगितले. यावेळी किडरोग सर्वेक्षण साहित्याचेही वाटप उपस्थित शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून मोफत करण्यात आले. उपस्थित सर्व शेतकऱ्यानी संस्थेच्या या उपक्रमाचे स्वागत करत आभार मानले.
यावेळी माजी सरपंच गोपाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र तायडे, मार्केट कमिटीचे प्रशासक डी. के. पाटील व प्रगतशील शेतकरी प्रेमराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मनोज चव्हाण, बाळू रोंदळसह गावातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.