जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जागतिक आरोग्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सकाळी 7 ते 8 या वेळात निपुण पॅथॉलॉजीचे सर्वेसर्वा डॉ. राहुल मयूर यांचे ‘आरोग्यासाठी – निदान चाचण्यांचे महत्व’ या विषयावरील जाहीर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी वर्षातून एकदा वाढदिवसाच्या निमित्त किंवा काही दिन विशेषाला आपल्या आरोग्याप्रती जागृत राहून आवश्यक त्या तपासण्या करून घेतल्यास आपल्याला अनेक विघातक आजारापासून वेळीच सावध होऊन आपले संरक्षण करता येते आणि भविष्यात होणारी हानी आपल्याला टाळता येते. असे मत त्यांनी व्यक्त करून कोणकोणत्या चाचण्या करणे आवश्यक असते याविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधानही केले.
यावेळी मांचावर डॉ. देवानंद सोनार संचालक, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, प्रा. अनंत महाजन नॅचरोपॅथी समन्यवयक आदी उपस्थित होते. डॉ. देवानंद सोनार यांनी प्रास्ताविकातुन जागतिक आरोग्य दिनाचे महत्व आणि त्यादृष्टीने योग विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सोनल महाजन यांनी तर आभार प्रा. अनंत महाजन यांनी व्यक्त केले.
जाहीर व्याख्यानानंतर सकाळी 8 ते 10 या वेळात निःशुल्क मधुमेह तपासणी शिबिरात उपस्थित सर्वांची मधुमेह तपासणी करण्यात आली. अनेक महिला पुरुषांनी या शिबिरामध्ये आपली मधुमेह तपासणी करून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पंकज खाजबागे, प्रा. ज्योती वाघ, प्रा. गीतांजली भंगाळे, बी. ए. आणि एम. ए. योगिक सायन्स, योगाशिक्षक पदविका, आणि नॅचरोपॅथी सर्टिफिकेट कोर्स च्या विद्यार्थ्यांनी आपले विशेष योगदान दिले. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.