पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुप्रसिद्ध आस्था डेंटल हॉस्पिटलतर्फे बुरहाणी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी व जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले. डॉ. आनंद जैन, डॉ. नम्रता जैन आणि संपूर्ण तज्ज्ञ दंतचिकित्सक टीम यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तोंडाच्या स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लहान वयातच दातांचे आरोग्य राखण्याचे महत्त्व समजावून सांगणे हा होता.


दंत तपासणी आणि आरोग्य जनजागृती
या शिबिरात विद्यार्थ्यांच्या दातांची मोफत तपासणी, योग्य ब्रशिंग पद्धतींबाबत प्रात्यक्षिके, तसेच दंत आरोग्य सुधारण्यासाठी आहार आणि जीवनशैली याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. आनंद जैन, डॉ. नम्रता जैन, डॉ. गौरव येरमाळकर, डॉ. साक्षी छाजेड, डॉ. निकिता छाजेड, डॉ. भानुप्रिया पाटील आणि डॉ. योगेश्वरी तोमर यांनी विद्यार्थ्यांच्या दंत आरोग्यासंबंधी सखोल तपासणी केली आणि योग्य उपचार व सल्ला दिला.
विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याविषयी जागरूकता
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी ब्रशिंग टेक्निक्स, आहारातील साखरेचे प्रमाण, डेअरी पदार्थांचे महत्त्व, मसूडे व दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक सवयी यासंदर्भात प्रश्न विचारले. दंत तज्ज्ञांनी त्यांच्या शंका स्पष्ट करताना “स्माईल इज द बेस्ट ज्वेलरी”, त्यामुळे आपल्या दातांची योग्य काळजी घ्या’ असा महत्वपूर्ण संदेश दिला.
अबॅकस स्पर्धेच्या विजेत्यांचा गौरव
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अबॅकस स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण सोहळाही आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. आनंद जैन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गणित कौशल्य दाखवत ही स्पर्धा यशस्वी केली.
४०० विद्यार्थ्यांना मोफत सॅम्पल्स वाटप
या शिबिरात रेडी आणि इंडोको कंपनीतर्फे ४०० विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्ट व अन्य दंत आरोग्यविषयक सॅम्पल्स वितरित करण्यात आले. इंडोको कंपनीचे वैद्यकीय प्रतिनिधी रोशन पाटील आणि रेडी कंपनीचे प्रतिनिधी शुभम टेकवडे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या दोन्ही कंपन्यांनी शिबिरासाठी मोफत सॅम्पल्स प्रायोजित करून विद्यार्थ्यांच्या दंत आरोग्यासाठी योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सेक्रेटरी मोहम्मद बोहरी, शाळेचे व्हाइस चेअरमन मुस्तफा लाकडावाला, प्रशासक बी. एन. पाटील, प्री-प्रायमरीच्या मुख्याध्यापिका भगवती राऊत, पर्यवेक्षिका अस्मिता पाटील, वरिष्ठ शिक्षिका ज्युली फर्नांडिस यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता पाटील यांनी केले, तर संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. डॉ. आनंद जैन आणि डॉ. नम्रता जैन यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे आभार मानत असे उपक्रम भविष्यातही राबवण्याचे आश्वासन दिले.
आस्था डेंटल हॉस्पिटल समाजात दंत आरोग्य जागरूकतेसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. लहान वयात योग्य दंत उपचार आणि काळजी घेतल्यास भविष्यात मोठ्या समस्या टाळता येतात हे पटवून देण्यासाठी शाळांमध्ये मोफत दंत तपासणी आणि जनजागृती शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या बौद्धिक विकासासाठी अशा महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन भविष्यात अधिकाधिक शाळांमध्ये केले जाणार आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या दातांची योग्य काळजी घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन आस्था डेंटल हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.


