छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा !- पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल


रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सर्वांनी मिळून शांततेत आणि उत्साहाने साजरा करावा, यासाठी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी आवाहन केले आहे. त्यांनी मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची आयोजकांनी विशेष काळजी घ्यावी, असे स्पष्ट प्रतिपादन शांतता कमिटीच्या बैठकीत केले.

पोलिस स्टेशनच्या आवारात आयोजित या बैठकीत आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि नवीन कायद्यांबाबत चर्चा करण्यात आली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी यावेळी नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करताना, त्यांनी कायद्याविषयी जागरूक राहण्याचेही आवाहन केले. बैठकीत माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती रावेरकरांनी नियोजनबद्ध आणि शांततेत साजरी केली जाईल, असे आश्वासन दिले. माजी नगराध्यक्ष हरिष गनवानी, गयास शेख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. योगेश गजरे यांनी नवीन कायद्यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या बैठकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, उद्योग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, भावलाल महाजन, अशोक शिंदे, संतोष पाटील, मुत्तलिफ मेंबर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मेहमूद शेख, अजिंक्य वाणी, असदउल्ला खा, बाळु शिरतुरे, शैलेश अग्रवाल, योगेश पाटील, घनश्याम पाटील, प्रशांत पाटील, पंकज वाघ, शरद राजपुत, सादिक मेंबर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पोलिस पाटील उपस्थित होते. पोलिस प्रशासन आणि शांतता कमिटीच्या सहकार्याने यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संयमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सर्वांनी मिळून हा उत्सव सन्मानपूर्वक आणि शांततेत साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.