अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथील जावई प्रवीण माळी यांच्या सामाजिक, शैक्षणिक हेतूने दोंडवाडा ता. शहादा गावापासून जवळील फेस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात दररोज पायी जाणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना युवकमित्र परिवार नंदूरबार या संस्थेमार्फत शाळेच्या पहिल्याच दिवशी ३० सायकली मोफत भेट देण्यात आल्या आहेत.
अमळनेर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ येथे गाडी चालक म्हणून काम करणारे संतोष गिरधर माळी यांचे जावई पुणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात लिपिक म्हणून नोकरीला आहेत.सुरुवातीपासूनच सामाजिक कामात आवड असलेले प्रवीण माळी यांनी युवक मित्र परिवाराच्या माध्यमातून आत्तापर्यंत राज्यात पाचशे वाचनालय सुरू करून पुस्तके उपलब्ध करून दिली.
राज्यात कोविड संकट काळात अनेक दिवस शाळा बंद होत्या. ता.४ रोजी प्रथमच शाळा भरविण्यात आल्या.त्यानिमित्त युवकमित्र परिवार नंदूरबार या संस्थेमार्फत दररोज लांब दूरवर पायी जाणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू अशा ३० विद्यार्थ्यांना मोफत सायकल भेट देण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानी फेस येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हिरजी कनाशी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन हे होते.यावेळी विद्यार्थ्यांना सायकल बँक उपक्रमाचे महत्व पटवुन देत फिट इंडिया चा नारा देण्यात आला. यावेळी सायकल मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
युवकमित्र परिवार या संस्थेमार्फत ग्रामीण भागात लांब दूरवर पायी जाणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ‘सायकल बँक’उपक्रमामार्फत मोफत सायकली भेट देण्यात येतात.श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय फेस या शाळेला या उपक्रमातर्गत मोफत सायकल वितरण सोहळा पार पडला. यावेळी रोहिदास पाटील, भाऊ वेडू चौधरी, मणीलाल चौधरी, दिलीप पाटील, मणीलाल चौधरी, रतीलाल चौधरी यांच्यासह मुख्याध्यापक किरण पाटील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन जे.डी. पाटील यांनी केले तर आभार खगेंद्र कुंभार यांनी मानले.