दोन कोटीचे कर्ज मंजूर करण्याचे आमिष दाखवत साडेसहा लाखांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो, त्यासाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली राकापार्क येथील दोन जणांकडून साडेसहा लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राका पार्कमध्ये पराग प्रभाकर भावसार हा तरुण वास्तव्यास आहे. पराग हा जून २०२१ त्याचा मामेभाऊ भूषण अविनाश भावसार रा. तिडके नगर, नाशिक यांच्याकडे दाक्षायणी फायनान्सशियल सर्व्हिसेस कंपनीत शाखाधिकारी म्हणून नोकरीला होता.  सोशल मीडियावर कंपनीचा प्रचार करीत असतांना ओमप्रकाश पाटीलआणि राहूल हिलाल देवरे हे दोघे  परागच्या संपर्कात आले. भूषण भावसार याने त्यांना सीएसआर फंडबद्दल माहिती देवून कर्ज मंजूर होणार असल्याचे सांगितले.

परंतु त्यापुर्वी प्रोसेसिंग फी म्हणून दोघांकडून साडेसहा लाख रूपये भरण्यास भूषण भावसार याने सांगितले.  त्यानुसार ओमप्रकाश पाटील आणि राहूल देवरे यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर केली. त्याचा पुरावा म्हणून शाखाधिकारी पराग भावसार यांच्या नावाने नोटरी देखील करुन दिली.

अनेक महिन्यांचा कालावधी उलटून देखील संबंधित कर्जाबाबत पराग भावसार व दोन्ही ग्राहकांनी भुषण भावसार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. परंतु सुरुवातीला त्यांना काम सुरु असल्याचे सांगत वेळ मारुन नेली. मात्र काही दिवसानंतर त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ओमप्रकाश पाटील व राहुल देवरे यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली.

गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता पराग भावसार यांनी  रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content