जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भवानीपेठ येथे राहणाऱ्या शिक्षकाच्या क्रेडीट कार्डवर अज्ञात व्यक्तीने परस्पर १ लाख १९ हजार रूपयाचे लोन काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री शनीपेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहा शेख अमिनोद्दीन (वय-३९) रा. भवानीपेठ, जळगाव हे वडील व मुलीसह वास्तव्याला आहेत. शहरातील एका उर्दू शाळेत ते शिक्षक म्हणून नोकरीला आहे. त्यांनी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्डसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये अर्ज केला होता. त्यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये क्रेडीट कार्ड पोस्टाद्वारे मिळाले. फरहा शेख यांनी अद्यापपर्यंत क्रेडीट कार्डचा कोणताही वापर केलेला नाही. दरम्यान १७ जानेवारी रोजी क्रेडीट कार्डच्या कस्टमर केअरमधून फोन आला व सांगितले की, तुम्ही घेतलेल्या १ लाख १९ हजार रूपयांचे लोनचे दोन हप्ते थकीत आहे ते लवकरात लवकर भरा असे सांगण्यात आले. परंतू लोन त्यांनी घेतलेलेच नसल्याने त्यांनी बँकेत धाव घेवून चौकशी केली असता वेगवेगळे दोन ठिकाणी लोन घेतल्याचे दिसून आले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.