पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील २५ वर्षीय तरुणीला बँकेच्या खात्याची केवायसी करण्याच्या नावाखाली क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ३९ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याच प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील २५ वर्षीय तरुणी हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून महिलेचा फोन आला. तिने सांगितले की, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड आणि पॅन लिंक नाही. त्यामुळे तुम्हाला केवायसी करावी लागेल. यासाठीच तुम्हाला पैसे लागतील. अज्ञात महिलेने तरूणीला क्रेडिटकार्डचा १६ अंकी नंबर सांगण्यास भाग पाडले. त्यानुसार त्यांच्या खात्यातून परस्पर ३८ हजार ९८१ रुपये वर्ग करून त्यांची फसवणूक केली. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार रामदास चौधरी करीत आहे.