जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दापोरा येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजूतीने दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सोमवारी २३ मे रोजी रात्री चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमिलाबाई दिलीप सोनवणे (वय-५७) रा. दापोरा ता.जि.जळगाव असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलीसांकडून माहिती अशी की, प्रमिलाबाई सोनवणे ह्या दोन मले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला होते. बुधवारी १८ मे रोजी दापोरा गावात एका ठिकाणी लग्न होते. लग्नासाठी जळगाव येथील ज्ञानेश्वर प्रकाश मालचे हे कार क्रमाक (एमएच १९ डीवाय ४७१३) ने आले. त्यावेळी त्यावेळी प्रमिलाबाई सोनवणे यांचा मुलगा अरूण हा ओट्यावर बसलेला होता. त्याचवेळी घरासमोरून कार जात असतांना अज्ञात दुचाकीधारकाने कारला कट मारला व पसार झाला. अरूणनेच कारला कट मारल्याचा गैरसमजूतीतून अशोक रमण नाईक, मंगलसिंग हिलाल सोनवणे दोन्ही रा. दापोरा ता.जि.जळगाव, ज्ञानेश्वर प्रकाश मालचे रा. जळगाव आणि रमेश सुदाम मोरे रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांनी अरूणला मारहाण केली. अरूणला मारहाण होत असल्याचे समजताच अरूणची आई प्रमिलाबाई, भाऊ विजय आणि विजयची पत्नी प्रियंका हे आवराआवर करण्यासाठी आले. तिघांना देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात प्रमिलाबाई सोनवणे ह्या दगडावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असतांना रविवारी २२ मे रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
याप्रकरणी विजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक रमण नाईक, मंगलसिंग हिलाल सोनवणे दोन्ही रा. दापोरा ता.जि.जळगाव, ज्ञानेश्वर प्रकाश मालचे रा. जळगाव आणि रमेश सुदाम मोरे रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांच्याविरोधात जळगाव तालुका पोलीसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.