इस्लामाबाद, वृत्तसंस्था | तुर्कस्थानने पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी सुरु केली आहे. अध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांनी रविवारी ही घोषणा केली. पाकिस्तान तुर्कस्थानकडून ही युद्धनौका विकत घेणार आहे. एर्दोगान यांच्या हस्ते टीसीजी किनलियादा या युद्धनौकेचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानसाठी युद्धनौकेची बांधणी करत असल्याची घोषणा केली. आनाडोलु वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
युद्धनौकेची डिझाईन, बांधणी आणि देखभाल करणाऱ्या जगातील १० देशांमध्ये टर्कीचा समावेश होतो, असे एर्दोगान म्हणाले. रविवारपासून पाकिस्तानसाठी युद्धनौकची बांधणी सुरु झाली असून त्याचा पाकिस्तानला फायदा होईल. आपल्या नौदलाचा संपन्न, गौरवशाली विजयाचा वारसा पुढे नेऊ, अधिक बळकट करु असे एर्दोगान म्हणाले.
जुलै २०१८ मध्ये पाकिस्तानी नौदलाने MILGEM श्रेणीच्या चार युद्धनौका खरेदी करण्यासाठी टर्कीबरोबर करार केला आहे. या श्रेणीच्या युद्धनौकांचे वैशिष्टय म्हणजे त्या रडारला सापडत नाहीत, असेही वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाचे कमांडर अॅडमिरल झफर महमूह अब्बासी आणि एर्दोगान या दोघांनी युद्धनौका बांधणीच्या कामाचे उद्घाटन केले.
दोन युद्धनौका तुर्कस्थानमध्ये बांधल्या जाणार आहेत तर टेक्नोलॉजी हस्तांतरणांतर्गत दोन युद्धनौकांची बांधणी पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तान-तुर्कस्थानचे संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक बळकट होणार आहेत, असे एर्दोगान या प्रसंगी म्हणाले. MILGEM श्रेणीतील जहाजे ९९ मीटर लांब असून २९ नॉटीकल माइल्स एवढा त्यांचा वेग आहे.