
जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील कार्तिकी एकादशी म्हणजे भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचा सोहळा. या दिवशी साजरा होणाऱ्या श्रीराम रथोत्सवाला तब्बल १५३ वर्षांचा सुवर्ण इतिहास लाभला आहे. या रथोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव नगरीतील काही मानाच्या कुटुंबांनी पिढ्यानपिढ्या या उत्सवाच्या आयोजनात आणि सेवेत आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यात पोलीस पाटील परिवार हा सर्वात उल्लेखनीय परिवार म्हणून ओळखला जातो. सध्या प्रभाकर काशिनाथ पाटील हे जळगावचे विद्यमान पोलीस पाटील असून त्यांच्या कट्ट्याच्या चार पिढ्यांनी या रथोत्सवात अखंडपणे सेवा दिली आहे.
दिवंगत काशिनाथ जयराम पाटील हे १९४० ते १९७८ या काळात जळगाव शहराचे पोलीस पाटील होते. ब्रिटिश राजवट ते स्वातंत्र्योत्तर काळ असा तब्बल ३७ वर्षांचा त्यांचा कार्यकाळ होता. या दीर्घ काळात त्यांनी दरवर्षी श्रीराम रथोत्सवात सेवाभावाने सहभाग नोंदवला आणि अखेरपर्यंत ही परंपरा जपली. त्यांचे निधन १९९४ साली झाले तरी त्यांच्याद्वारे रुजवलेली सेवा आजही तितक्याच निष्ठेने सुरू आहे.
यानंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांनी, प्रकाश काशिनाथ पाटील यांनी हा वारसा पुढे नेला. त्यांनी १९७८ ते २००३ या काळात जळगाव शहराचे पोलीस पाटील म्हणून कार्य केले आणि रथोत्सवातील सहभाग अखंड ठेवला. २००३ मध्ये त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी त्यांच्या भावाकडे प्रभाकर काशिनाथ पाटील यांच्याकडे आली, जी ते आजही मोठ्या जबाबदारीने आणि श्रद्धेने पार पाडत आहेत.
पाटील परिवारातील पंडीत काशिनाथ पाटील, स्व. नारायण काशिनाथ पाटील आणि स्व. हेमराज काशिनाथ पाटील यांनी देखील वर्षानुवर्षे या रथोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. आज त्यांच्या चौथ्या पिढीतील तरुण सदस्य सुजीत प्रकाश पाटील, ललित पंडीत पाटील, ज्ञानेश्वर नारायण पाटील, जितेंद्र प्रभाकर पाटील, अशोक प्रभाकर पाटील, शिवाजी प्रभाकर पाटील आणि जयेश हेमराज पाटील हे सर्वजण या मानाच्या परंपरेचे संवर्धन करण्याचे काम करीत आहेत.
जळगाव शहराच्या श्रीराम रथोत्सवाचा हा वारसा केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली निष्ठा याचे सुंदर उदाहरण ठरते.



