साडेचार हजार वाहक – चालकांच्या नोकऱ्या वाचल्या

 

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.

एसटीची सेवा पूर्वपदावर येण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचे नमूद करत सरळसेवा भरतीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्यात आली होती. २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत चालक व वाहक पदामध्ये रोजंदार गट क्र. १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या होत्या. आज एका आदेशाद्वारे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची खंडित करण्यात आलेली सेवा पूर्ववत करण्यात यावी व गरजेनुसार नियमित वेतनश्रेणीवरील चालक व वाहकांचाच वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अनुकंपा तत्त्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगितीही उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रानुसार पुढील कार्यवाही करून त्याचा अहवाल १० सप्टेंबरप्यंत महाव्यवस्थापकांना सादर करण्यात यावा, असेही नमूद करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा आदेश जारी केला आहे.

एसटीचं उत्पन्न थांबल्याने कर्मचारी कपातीकडे एसटीची वाटचाल सुरू होती. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवण्याचा मोठा निर्णय झाल्याने व एसटीला आधीच जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्याने लवकरच एसटी सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.

Protected Content