दाणा बाजारातील ड्रायफ्रुट दुकान फोडून साडेचार लाखांची रोकड लंपास

जळगाव-लाईव्ळ ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात शहर पोलीस ठाण्याच्या समोर फूले मार्केटमधील चार दुकाने फोडली होती. त्यानंतर आता दाणाबाजारातील दोन दुकाने फोडल्याची घटना समोर आली आहे. जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या दाणा बाजारातील ड्रायफू्रटच्या दुकानावरील छताचा पत्रा कापून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातून सुमारे साडेचार लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघकीस आली. दरम्यान, चोरी करण्यापुर्वी चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील गायत्रीनगरातील दिलीप शोभराजमल वाधवाणी यांचे दाणा बाजारात सच्चा सौदा नावाने ड्रायफ्रुटचे दुकान आहे. शनिवारी १ जून रोजी व्यापारी हिशोबासाठी येणार असल्याने वाधवाणी यांनी त्याला देण्यासाठी आणलेले पैसे दुकानाच्या गल्ल्यात ठेवलेले होते. मात्र व्यापारी न आल्यामुळे त्यांनी पैसे तेथेच ठेवून ते रात्री दुकान बंद करुन घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने त्यांचे दुकान बंदच होते. दिलीप वाधवाणी यांचा मुलगा हर्ष वाधवाणी हा सोमवारी ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दुकान उघडले त्यावेळी दुकानात चोरी समजले. चोरट्याने गल्ल्यातील साडेचार लाख रुपये चोरुन नेल्याचे समोर आले.

वाधवाणी यांनी तात्काळ घटनेची माहिती शहर पोलीसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्याह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानाची पाहणी केल्यानंतर त्यांना दुकानाच्या छतावर असलेला पत्रा कापलेला दिसून आला. त्यामुळे चोरटा हा दुकानाच्या मागील बाजूने पत्र्यावर चढून तो आत शिरल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, चोरी करण्यापुर्वी चोरट्याने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर कापून टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content