जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्षांना मारहाण; एरंडोल पोलीसात अदखलपात्र गुन्हा

एरंडोल प्रतिनिधी ।  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निपाणे शाखेत शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांना पिक कर्ज प्रकरणात बँक व्यवस्थापकाने शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी आमले यांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जवखेडे सिमचे येथील शेतकरी ज्ञानेश्वर आमले हे पिक कर्जाचे पैसे घेण्यासाठी निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत गेले. त्याठिकाणी त्यांनी पैसे मिळाले नाही. त्यानंतर एटीएम मध्ये देखील पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी निपाणे येथील जिल्हा बँकेचे व्यवस्थापक दिनेश पाटील यांना पैसे न मिळाल्याचा जाब‍ विचारला. बँक व्यवस्थापकांनी आमले यांना अरेरावीची भाषा वापरून ज्ञानेश्वर आमले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली.

 

दरम्यान आमले यांच्या गावातील शेतकरी अशोक धोंडू पाटील यांना निपाणे शाखेतून पैसे काढले असता त्यांनी काही नकल व खराब नोटा मिळाल्या. त्या नोटा बँके परत करण्यासाठी बँकेत गेले असता शेतकरी अशोक पाटील यांना देखील बँक व्यवस्थापकाने अरेरावीची भाषा वापरून गैरवर्तन केले. आमले यांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलीसात अदखपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे व अनिल पाटील , संदीप सातपुते , अखिल मुजावर हे पुढील तपास करीत आहेत.

 

बँक व्यवस्थापकाची उचलबांगडी

बँक शाखा व्यवस्थापक दिनेश पाटील यांनी केलेल्या अरेरावीची भाषा आणि गैरवर्तनाच्या प्रकरणावरून उत्राण शाखेला उचलबांगडी करण्यात आली आहे. अशी माहिती समोर आली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विकास सोसायटीकडून कर्ज मिळते. नियमानुसार २५ टक्के कर्जाची रक्कम जिल्हा बँक शाखेचे कडून मिळते. जवखेडे सिम, बाम्हणे, निपाणे या तिन्ही गावांच्या सुमारे ५०० शेतकऱ्यांचे पीक कर्ज निपाणे बँक शाखेकडून वितरित करण्यात येत आहे . जिल्हा परिषदेवर उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेल्या ज्ञानेश्वर आमले यांना पीक कर्जासाठी व्यवस्थापकाच्या मुजोरीला सामना करावा लागला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना पिक कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी किती हाल सोसावे लागत असतील अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत आहे.

Protected Content