पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा येथील महालपूरे मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात भाजपातर्फे लोकसभा व विधानसभेची आलेली ‘ऑफर’ नाकारल्याचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.
पाचोरा येथील महालपूरे मंगल कार्यालयात आज गुरुवार, दि. ९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना माजी आमदार दिलीप वाघ यांनी गौप्यस्फोट करतांना सांगितले की, सन – २०१४ मध्ये एकनाथराव खडसे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना विधानसभा निवडणुकीत व सन – २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी ‘ऑफर’ दिली होती. मात्र मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याने पक्ष सोडून पक्षाशी कधीही गद्दारी केली नाही. व यापुढेही करणार नाही.
राज्यात महाघाडीचे सरकार असल्याने सहकाराच्या निवडणुका या आघाडी करून लढण्याचे आदेश आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याबाबत अद्याप वरिष्ठांकडून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नसल्याने युवा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी जय्यत तयारी करा. प्रत्येक निवडणुकीत शरदचंद्र पवार यांनी समान अधिकार दिलेले असल्याने कार्यकर्त्यांनी व घरातील पुरुषांनी महिलांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना राजकीय बळ देऊन सक्षम करावे. युवा कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे विचार व कार्य घराघरात पोचविण्याचे जबाबदारी घ्यावी व पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भडगाव रोडवरील महालपुरे मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा वंदना चौधरी, पी. टी. सी. चे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, माजी जिल्हाउपाध्यक्ष प्रा. भागवत महालपुरे, शालीग्राम मालकर, पिपल्स बॅंकेचे संचालक प्रकाश पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.