यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील बोरोले नगर भागात दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या एका बेवारस गो मातेचा यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मिळून विधिवत अंत्यविधी केला. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बोरोले नगर परिसरात एक गाय सुमारे दोन दिवसांपासून मृत अवस्थेत पडून होती. मोकाट कुत्रे त्या गायीचे लचके तोडत असल्याचे विदारक दृश्य दिसत होते. परिसरातील काही जागरूक नागरिकांनी याची माहिती तात्काळ यावल नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांना दिली.
नागरिकांकडून माहिती मिळताच राकेश कोलते यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृत गायीला ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये उचलून शहराबाहेर नेण्यात आले. शहराबाहेर जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदण्यात आला आणि त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून त्या गो मातेचा अंत्यविधी करण्यात आला.
या अंत्यविधीच्या वेळी यावल शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह यावल नगरपालिकेचे कर्मचारी जितू चव्हाण, प्रशांत गजरे, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, नरेंद्र चव्हाण आणि जेसीबी चालक नारायण भील यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि परिश्रम घेतले. बेवारस गो मातेसाठी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकदा बेवारस जनावरांच्या मृत्यूनंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही, परंतु राकेश कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि गो मातेचा केलेला सन्मानजनक अंत्यविधी निश्चितच प्रेरणादायी आहे.