नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी २२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राज्यसभा खासदार रंजन गोगोई हे पुढील वर्षी होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, असं म्हटलं आहे.
“मला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच्या उमेदवारांमध्ये रंजन गोगोई यांचे नाव आहे. मला वाटते की, त्यांना आसामचा भावी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून समोर आणले जाऊ शकते. माजी सरन्यायाधीश गोगोई राज्यसभेवर जाऊ शकतात, तर ते भाजपाचे पुढील ‘संभाव्य’ मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होण्यासही सहमत असू शकतात, हे सर्व राजकारण आहे.” असे तरूण गोगोई यांनी म्हटले आहे.
तसेच, “अयोध्येतील राम मंदिराबाबतच्या निर्णयामुळे भाजपा रंजन गोगोई यांच्यावर खूश होती. नंतर त्यांनी भाजपाकडून राज्यसभेवर जात हळूहळू राजकारणात पाऊल ठेवले. तेव्हा त्यांनी राज्यसभेवर जाण्यास नकार का नाही दिला? ते आरामात मानवधिकार आयोग किंवा अन्य मोठ्या संस्थांचे अध्यक्ष होऊ शकले असते. मात्र त्यांना राजकीय महत्वकांक्षा आहेत आणि म्हणूनच त्यांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले, असल्याचेही तरूण गोगोई म्हणाले.
याचबरोबर तरूण गोगोई यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केले की, आपण आगामी निवडणुकीसाठी आसाममध्ये काँग्रेसचे संभाव्य मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार नाही.