पंकजा मुंडे यांनी मोबाईल खरेदीत केला १०६ कोटींचा घोटाळा – धनंजय मुंडे

dhananjay pankaja 20180363195

मुंबई (वृत्तसंस्था) ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पंकजा यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.

पंकजा यांच्यावर चिक्की खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, आता मोबाईल खरेदी प्रकरणातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप, त्यांचे चुलतभाऊ आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचं दिसत आहे. पंकजा मुंडेंच्या अधिपत्याखाली असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्याच्या ३० जिल्ह्यातील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रासाठी जवळपास लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंकजा यांच्या विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग (आयसीटी-आरटीएम) योजनेसाठी हा स्मार्टफोन्स खरेदी करण्यात येत आहेत. याबाबतचा सरकारी अध्यादेश (जीआर) २८ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आला असून, त्यात हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे २२०० रूपये जास्तीची रक्कम देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा १७ या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६ हजार ४९९ रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना ८ हजार ७७७ रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण विभागाने एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या कंपनीकडून गरज नसताना आणखी ५१०० अतिरिक्त मोबाईल खरेदी केले आहेत, असेही मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सरकारी कामासाठी अशी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यापूर्वी कंपनीची पडताळणी करणे, गरजेचे असते. मात्र, या कंपनीचा पत्ताही निविदा कागदपत्रात दाखविण्यात आलेला नाही. यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असून याची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याकडे गंभीरतेने लक्ष देऊन तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.

Add Comment

Protected Content