आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

हैदराबाद-वृत्तसंस्था | भ्रष्टाचार प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे ते झोपेत असतांनाच अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना आज भल्या पहाटेच अटक करण्यात आली असून तेलगू देसम पक्षातर्फेच ही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. आज पहाटे आंध्रची राजधानी अमरावती येथील चंद्राबाबू नायडू यांच्या निवासस्थानी पहाटे तीनच्या सुमारास सीआयडीचे पथक धडकले. या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे.

कौशल्य विकास विभागात घोळ झाल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर ठेवण्यात आला असून या संदर्भात २०२१ साली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच खटल्यात त्यांना सीआयडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच लोकसभा निवडणुका होणार असून याआधीच नायडूंना करण्यात आलेल्या अटकेमुळे आंध्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. नायडू हे दीर्घ काळ आंध्रचे मुख्यमंत्री होते. तर ते सध्या राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते असल्याने आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या अटकेचा मुद्दा केंद्रस्थानी राहू शकतो.

Protected Content