मुंबई प्रतिनिधी । अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी करून स्थापन केलेले औट घटकेच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा एक खूप मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. प्रियम गांधी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकात याबाबत अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. शिवसेनेबरोबर युती करण्यास अजित पवारांचा विरोध होता. त्यांचा हा विरोध नेमका का आणि कशामुळे होता? यासंदर्भात प्रियम गांधी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकात गौप्यस्फोट करण्यात आला आहे. अजित पवारांचा तात्विक आणि राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास विरोध होता आणि यामुळेच त्यांनी फडणवीसांबरोबर हात मिळवणी केली, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
या पुस्तकात म्हणण्यात आले आहे, की, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय चुकीचा आहे, शिवसेनेला पाठिंबा दिला तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होऊ शकते, असे अजित पवार यांना वाटत होते. या निर्णयामुळे आपली राजकीय कारकिर्दही खराब होण्याची भीती अजित पवारांना वाटत होती, असेही या पुस्तकात म्हणण्यात आले आहे. दरम्यान, अजित पवार यांना सुनील शेळके, संदीप क्षीरसागर, राजेंद्र शिंगणे, सुनील भुसारा, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, सुनील तिंगरे, धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ, बाबासाहेब पाटील, दौलत दरोडा, नितीन पवार, अनिल पाटील आदींसह अन्य अशा २८ आमदारांचा पाठींबा असल्याचे त्यांनी फडणवीस यांना सांगितले होते. यानुसार पहाटेच्या शपथविधीचे नाट्य रंगले होते असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.