वाळू माफिया आणि दोन नंबरवाल्यांसाठी धरणगावातील सीसीटीवी कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष?

cctv camera

 

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्यावर मोठा गाजावाजा करून लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी बहुतांश कॅमेरे आता शोभेची वस्तू झाले आहेत. कारण रस्त्यांवर लावलेले बरेच कॅमेरे बंद पडले आहेत. शहरात साधारण ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र शहरात बसवलेले बहुतांश कॅमरे स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आणि दुरुस्तीअभावी बंद पडले आहेत. दरम्यान, वाळू माफिया आणि दोन नंबरवाल्यांच्या सोयीसाठी मुद्दाम सीसीटीवी कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत असून निवडणूक लक्षात घेता हे कॅमरे तत्काळ सुरु करावेत अशी मागणी होत आहे.

 

 

शहरात सतत घडणारे वादविवाद लक्षात घेता तत्कालीन विभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी मोठया मेहनतीने शहरातील संवेदनशील असणार्‍या प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. शहरातील जवळपास सर्वच भागात कॅमेरे बसविण्यासाठी शहरातील व्यावसायिक,राजकीय नेते व नगरपालिकेने ३.२५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता. संपुर्ण शहरात वायफाय कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमरे बसविण्याचा हा महत्त्वकांक्षी प्रयोग यशस्वी झाला होता. पोलीस प्रशासन, नगरपालिका आणि लोकसहभागातून असा अभिनव उपक्रम राबविणारी धरणावची क वर्ग असणारी राज्यातील पहिली नगरपालिका ठरली होती. या उपक्रमाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे आदींनी माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील, मुख्याधिकारी सपना वसावा, न.पा. गटनेते दीपक वाघमारे व नगरसेवकांची भेट घेतली होती. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पालिकेने आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केलेले होते. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला त्यांनी सकारात्मकता दर्शवत नगरपालिकेकडून दोन लाख 45 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

 

 

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर शहरातील गुन्ह्यामध्ये कमालीची घट झाली होती. मात्र आता तेच कॅमेरे शो पीस झालेली दिसून येत आहेत.एवढेच नव्हे तर,किरकोळ वाद व धार्मिक तणाव देखील बऱ्यापैकी थांबले होते. अनेकवेळेस सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोर कैद झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. बसस्थानकावरील चोरींचे व विद्यार्थिनींचे छेडखाणींचे प्रकार देखील बंद झाले होते. आता मात्र, याशहरात परिस्थिती वेगळीच आहे. मागील काही महिन्यांपासून कॅमेरे बंद असल्यामुळे समाजकंटक निर्धास्तलेल्याचे चित्र असून वाद व छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत.

 

 

शहरातील प्रमुख रत्यावर देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्रीची चोरटी वाहतूक येऊ नये म्हणून मागील काही महिन्यांपूर्वी ठरवून सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडण्यात आल्याची चर्चा गावात होती. तर धरणी, शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील देखील कॅमेरे दोन नंबरवाल्यांची सोय म्हणून दुरुस्त केले जात नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात मोठा वाद झाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न विचारला जात आहे. तर पोलीस प्रशासनाने तत्काळ कॅमेरे दुरुस्ती करावी अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.

Add Comment

Protected Content