जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रिधूर गावात उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एका ट्रॅक्टर चालकाला दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी पट्टीने मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच जिवेठार मारण्याची धमकी देखील दिल्याची घटना शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कांचन नगरात रहिवासी असलेले रोहिदास रावण कोळी वय ३४ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांनी प्रभाकर कोळी आणि आकाश संजय बाविस्कर दोन्ही रा. रिधुर तालुका जळगाव या दोघांना उसनवारीने दहा हजार पाचशे रुपये दिले होते. दरम्यान ते पैसे मागण्यासाठी रोहिदास कोळी शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता रिधुर गावात गेले होते आणि त्यांनी उसनवारीने दिलेले पैसे मागितले.
या रागातून प्रभाकर कोळी आणि आकाश बाविस्कर या दोघांनी रोहिदास कोळी यांना शिवीगाळ केली, तसेच लोखंडीपट्टीने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच तू इथून निघून जा, पुन्हा आला तर जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी अखेर रोहिदास कोळी यांनी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे प्रभाकर कोळी आणि आकाश बाविस्कर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आहे.