जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढत्या हवा प्रदूषणावर मात करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत ‘फॉग कॅनन’ मशीन दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी गुरूवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ५ वाजता दिली आहे.
ही मशीन रस्त्यांवर फिरून थंडागार पाण्याचे फवारे मारते, ज्यामुळे हवेतील धूळ आणि मातीचे कण खाली बसण्यास मदत होते आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागतो. जळगावात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना या फिरत्या पाण्याच्या फवाऱ्यांमुळे थंडावा मिळत असल्याचा अनुभव येणार आहे. मात्र, महानगरपालिकेने ही मशीन विशेषतः हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी आणली आहे. मशीनमधून उच्च दाबाने (हाय प्रेशर) पाण्याचे सूक्ष्म फवारे बाहेर पडतात. हे फवारे हवेत मिसळलेल्या धुलिकणांना आपल्यात सामावून घेतात आणि त्यांना खाली जमिनीवर पाडतात. यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
जळगाव महानगरपालिकेने शहरात एकूण किती ‘फॉग कॅनन’ मशीन दाखल केल्या आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या उपक्रमामुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘फॉग कॅनन’ हे तंत्रज्ञान देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये यापूर्वीच वापरले जात आहे. दिल्ली, चंदीगड यांसारख्या अति प्रदूषित शहरांमध्ये तसेच महाराष्ट्र राज्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड यांसारख्या औद्योगिक शहरांमध्येही हवेतील धूळ आणि प्रदूषण नियंत्रणासाठी या मशीनचा प्रभावीपणे उपयोग करण्यात आला आहे. जळगाव महानगरपालिकेने याच अनुभवाच्या आधारावर आपल्या शहरात हे तंत्रज्ञान आणले आहे.