मोठी बातमी : जळगाववरून लवकरच पुणे, हैदराबाद आणि गोवा येथे विमानसेवा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. यात आगामी फेब्रुवारी महिन्यापासून जळगाव विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि येथे उड्डाण प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ि्दली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ’फ्लाय ९१’ एअरलाईन्स कंपनीच्या व्यवस्थापन अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. यावेळी फ्लाय ९१ एअरलाईन्स कंपनीच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांपुढे जळगाव विमानतळ सेवेशी जोडण्याचा प्रस्ताव ठेवला. बैठकीपूर्वी फ्लाय ९१ कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, पर्यटन मंत्री गिरीश महाजन व खासदार उन्मेष पाटील यांच्याशी विमानसेवेबाबत चर्चा केली होती. विमानतळ सेवा सुरू करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावास मंत्री व खासदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात फ्लाय ९१ अधिकार्‍यांसोबत आज् बैठक झाली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांना प्रत्येक तालुक्यात पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या संदर्भात जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, जिल्ह्यातील १२ ठिकाणांचा विकास आराखडा वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागांद्वारे तयार केला जात आहे. जामनेर येथे नवीन टेक्सटाईल पार्क प्रस्तावित आहे. धुळ्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला आहे. जळगाव बायपासचे् काम प्रगतीपथावर आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे अमळनेर येथील श्री.मंगळग्रह देव मंदिरात भाविक एका तासात पोहोचू शकणार आहेत.

दरम्यान, विमानतळावरून टॅक्सी सेवा देणार्‍या उद्योजकांना या विमानतळामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. जळगावमधून शिक्षण आणि कुशल रोजगारासाठी विशेषतः पुणे येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगारासाठी स्थलांतर होत आहे.

विमानतळ सेवेमुळे जळगाव पुण्याला जोडले जाणार आहे. विमानतळ सेवा विशेषतः रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यास मदत करेल आणि लहान व्यवसायांना चालना देईल. जळगाव किंवा भुसावळ येथून प्रत्येकी २२-२८ आसनी ५६ स्लीपर बसेस दररोज पुण्याला जातात. यातील बहुतांश बस आठवड्यातून किमान ४ दिवस भरलेल्या असतात. तसेच, रेल्वे २ टीयरमधील वातानुकूलित कोचमध्ये १२ आणि ३ टीयरमधील वातानुकूलित कोचमध्ये २३ जागा असल्याने प्रत्येक ट्रेनमध्ये पुण्याला जाण्यासाठी बुकिंग मिळत नाही. वाजवी दरात चांगल्या दर्जाची एअर कनेक्टिव्हिटीमुळे रेल्वे आणि बसेसवरील ताण कमी होईल, त्याचा जळगाव जिल्ह्यातील लोकांना फायदा होईल.असे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात विमानतळाच्या माध्यमातून ’कार्गो हब’ सेवा ही विकसित होऊ शकते. जळगाव येथे औद्योगिक क्षेत्रासह रेल्वे, धावपट्टी आणि महामार्ग एकमेकांपासून ५ किलोमीटर अंतरावर आहेत. विमानतळाभोवती १८ मीटर रुंदीचा नवीन रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्यामुळे परिसरातील जमीन मालकांना गोदामे आणि कारखाने विकसित करण्याची संधी निर्माण होईल. महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने सादर केलेला प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या विचाराधीन आहे.

केळीसारख्या नाशवंत वस्तू आणि सोन्याचे दागिने यासारख्या उच्च मूल्याच्या वस्तू जळगावमधून पुणे, गोवा आणि हैदराबाद मार्गे निर्यात केल्या जाऊ शकतात. याचा फायदा केवळ जिल्ह्यालाच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील खान्देश आणि जवळच्या भागातील जिल्ह्यांना होईल.

हवाई सेवा जळगावच्या अर्थव्यवस्थेतील पर्यटन, आदरातिथ्य, वाहतूक, कृषी, रिअल इस्टेट आणि उत्पादन क्षेत्रांना चालना देईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केली.

Protected Content