परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेतील अजून पाच आमदार हे शिंदे गटात येणार असल्याचा दावा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
परभणी येथे काल सायंकाळी शिवसेनेचा (शिंदे गट) हिंदू गर्व गर्जना मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिंदे गटाच्या अन्य नेत्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ना. सत्तार म्हणाले की, मागील अडीच वर्षांतील बॅकलॉग भरून काढायचा आहे. आता शेवटच्या वर्षांत जोरदार बॅटिंग करून विकासकामे सुरू केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामाचा वेग पाहून त्या गटातील अजून पाच आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. काही खासदारही योग्य वेळेची वाट पाहून या गटात सहभागी होणार आहेत असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, गोरगरिबांना न्याय देण्याच्या कामात कुणी आडकाठी करीत असेल तर ‘आरेऽऽला कारेऽऽने उत्तर द्या! आपली ताकद दाखवून द्या’, असे अब्दुल सत्तार यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगितले. याप्रसंगी शिंदे गटाचे उपनेते विजय नहाटा, माजी खासदार ऍड. सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, जिल्हा प्रमुख माधव कदम, उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे आदींची उपस्थिती होती.