शेंदुर्णी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील लक्ष्मण दौलत गुजर व मालनबाई लक्ष्मण गुजर यांच्या शेतात ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागून सुमारे पाच एकर क्षेत्रावरील मका व ज्वारीचे पीक जळून खाक झाले. सदर घटना दुपारी वीज तारांचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घडली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गट क्रमांक २९४/१ व २९४/२ मधील शेतात नुकतेच मका व ज्वारीचे पीक काढण्यासाठी तयार झाले होते. मात्र अचानक लागलेल्या आगीने संपूर्ण पीक जळून खाक झाले. केवळ पीकच नव्हे तर या शेतकऱ्यांनी नव्याने बसवलेली ठिबक सिंचन यंत्रणा व पाईपलाइन सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिकच वाढले आहे.
घटनेची माहिती मिळताच तलाठी योगेश ब्राह्मणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यामध्ये ६० आर क्षेत्रावरील मका व ४० आर क्षेत्रावरील ज्वारीचे पीक जळून गेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर शेतकरी शेतमजुरी करून तसेच कर्ज काढून पीक घेत होते. परंतु आगीमुळे त्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अशा शॉर्ट सर्किटमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने देखील योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळाल्यास पुढील शेतीसाठी आधार मिळू शकतो.