भुसावळ प्रतिनिधी । गुन्हेगारीमुळे कायम चर्चेत असणार्या भुसावळमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने केलेला गोळीबार व चाकू हल्ल्यात एका तरूणाचा मृत्यू झाला असून त्याची आई जखमी झाली आहे.
भुसावळ शहरात गोळीबाराच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. अलीकडेच पोलीस प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत अनेक गावठी कट्टे जप्त करण्यात आले होते. यामुळे काही दिवस गुन्हेगार शांत होते. मात्र आता गुन्हेगारीने डोके वर काढल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवास विलास दिनकर चौधरी (वय ३४) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकू व गावठी कट्टयासह प्राणघातक हल्ला केला. यात त्याच्यावर चाकूने सपासप वार करण्यात आले. तर नंतर त्याच्या शरीरावर गोळ्या देखील झाडण्यात आल्या. यामुळे त्या तरूणाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. तर या घटनेत त्याची आई देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे.
रात्री अकराच्या सुमारास हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याने विलास चौधरी याने घरात पळ काढला. त्याने दरवाजा आतून बंद करून घेतला. यानंतर पंधरा मिनिटांनी हल्लेखोर परत आले. त्यांनी घरावर दगडफेक केली. यानंतर त्यांनी मागील दरवाजाची कडी खोलून आत प्रवेश करून विलासवर गोळ्या झाडल्या.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोनि.दिलीप भागवत व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून घडल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी चौकशीस प्रारंभ केला आहे.