पाकिस्तानकडून गोळीबार; दोन जवान शहीद तर एक नागरिक ठार

श्रीनगर वृत्तसंस्था । पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले तर एक सर्वसामान्य नागरिकही ठार झाला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारताने देखील चोख उत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सैनिकही मारले गेल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळी सीमेपलीकडून घुसखोर पाठवण्याचे प्रयत्न केले. या घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारतीय सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त तीन नागरिक जखमी झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात परिसरातील दोन घरांचे नुकसान झाले आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनीही पाक सैन्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लामध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.

 

Protected Content