Home Cities अमळनेर शॉर्ट सर्किटमुळे आग; सात बिघे गहू, मका जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे आग; सात बिघे गहू, मका जळून खाक


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील आटाळे येथे शत्रुघ्न गाजमल पाटील आणि भरत गजमल पाटील यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत सात बिघे क्षेत्रातील गहू, मका आणि ठिबक सिंचन पाईप जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. पाटील बंधूंनी दीड बिघे गहू आणि साडेपाच बिघे मक्याची लागवड केली होती. पिके चांगली आल्याने ते आनंदी होते. मात्र, मंगळवारी दुपारी ४ वाजता शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून शेताला आग लागली.

तातडीने सरपंच आणि शेतकऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. मात्र, शेतात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने अग्निशमन गाडीला पोहोचायला उशीर झाला. गाडी आल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, बंबातील पाणी संपल्याने शेजारच्या विहिरीतून पाणी भरून आग विझवण्यात आली. आगीची झळ शेजारच्या मका पिकालाही बसू शकली असती, परंतु तेथील आदिवासी महिलांनी आग पसरू दिली नाही.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले, परंतु तोपर्यंत पाटील बंधूंच्या शेतातील पिकांची राख झाली होती. वीज मंडळाच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत असून महसूल विभाग आणि वीज मंडळाने पंचनामा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.


Protected Content

Play sound