यावल येथील घराला आग; संसारोपयोगी वस्तूंसह लाखोंचं नुकसान (व्हिडीओ)

हिन्दु मुस्लीम बांधवांनी एकत्र येवून विझवली आग

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे सरस्वती विद्या मंदिर शेजारील मदन बळवंतराव भोईटे यांचे घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून रोख रकमेसह लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागलेल्या घरांचे वयोवृद्ध कुटुंबीय रात्री उशीरापर्यंत बुलढाणाहुन परतल्यावर पंचनामान्याच्या कामास सुरूवात झाली आहे.

ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. भोईटे कुटुंबीय आज पहाटे सहाला नातेवाईकांकडे बुलढाणा येथे गेले होते. या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घराशेजारील बखळ जागा विकत घेण्यासाठी मुलाने पाठविलेले पाच लाख रुपये चोरांच्या धाकापोटी भोईटे यांनी कपाटात न ठेवता बेडवरील अंथरुणात लपून ठेवले होते. त्यामुळे या आगीत चार लाख ८५ हजार रुपये जळून खाक झाले असल्याची चर्चा आहे.

घटनास्थळी येथील पालिकेचा अग्निशामक बंब अखेरपर्यंत उपलब्ध न झाल्यामुळे नागरीकांचा पालिकेविषयी तीव्र संताप व्यक्त होत होता. नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आगीत घरातील सर्व चीजवस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुमारे तास दीड तासानंतर आग आटोक्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, “येथील सरस्वती विद्यामंदिर शेजारील मदन बळवंतराव भोईटे यांचे घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मदन भोईटे कुटुंबीय आज पहाटे सहा ला नातेवाईकांकडे बुलडाणा येथे गेले होते. दुपारच्या वेळी सर्वत्र सामसूम असल्याने व बंद घरात आग लागल्यामुळे त्याची कल्पना बाहेर लवकर आली नाही. घरात सागवानी लाकडांचा धाबा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्यावर शेजारच्यांना आग लागल्याची कल्पना आली. तोपर्यंत आगीने पूर्ण घर काबीज केले होते.परिसरातील व आगीची घटना पाहणारे नागरिक आग विझविण्यासाठी मिळेल ते साधन हातात घेऊन आग विझविण्यासाठी सरसावले.

घटनास्थळी माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, रमाकांत देशपांडे, माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, भाजपचे शहराध्यक्ष निलेश गडे, दिलीप वाणी, गणेश महाजन, पालिकेचे अधिकारी, तलाठी ईश्वर कोळी आदींनी भेट दिली.

फायर बॉल एक्सस्पायरी

येथील पालिकेने अग्निशामक बंब वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे पालिकेतून चार फायर बॉल आणून त्या आगीत टाकण्यात आले. जेणेकरुन बॉल फूटून आग त्वरीत आटोक्यात येईल. मात्र सदरचे फायरबॉल फूटून आग आटोक्यात न येता नागरिकांच्या मदतीनेच आग आटोक्यात आली. फायर बॉल निकामी ठरले.

समयसूचकता

सरस्वती विद्यामंदिर जवळ आग लागल्याची बातमी कळताच एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात बसलेले पालिकेचे पाणी पुरवठा व्हॉलमन अर्जुन लावणे यांनी तत्काळ सरस्वती विद्यामंदिर भागात नळांना पाणी सोडले. त्यामुळे पालिकेचा औषध फवारणी करणारा सर्वात लहान टॅंकरमध्ये आग विझवणारे नागरिक बादल्या भरून आणून टाकत होते.

यांनी विझविली आग

हिंदू मुस्लिम बांधवांनी आग विझविण्यासाठी मदत करत माणूसकीचा संदेश दिला. यात अरशद मोमीन, आकाश भोईटे, अतुल भोईटे, योगेश जाधव, गफ्फार मोमीन, आशिक शेख, किरण वाणी, सुनिल भोईटे, गेंडा कदम, दिलीप वाणी, भैय्या भोईटे, पदमाकर चौधरी, शेख असलम मोमीन, जमील कुरेशी, ईलयास शेख, शेख अलताफ, शेख समद, भैय्या चौधरी, राहुल चौधरी, राजु श्रावगी, प्रणव कापुरे, पराग भोईटे, बंडु महाजन, बापु भोईटे, बापु चौधरी, शांताराम कोळी, शुभम भोईटे, यशवंत बारी, बापु टेलर, गणेश भोईटे, कन्हैया वाणी यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.

व्हिडीओ लिंक

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!