अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील तळवाडे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या पॅनलला एका कुटुंबाने मतदान न केल्यामुळे जातपंचायतीने त्यांना वाळीत टाकल्याचा प्रकार घडल्याने संबंधीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तळवाडे येथील शरद उखा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की २५ मार्च २०१९ रोजी तळवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. तेव्हा मी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज फकीरा पाटील यांच्या पॅनलला मदत केली म्हणून माझेच नातेवाईक असलेले कौतिक तोताराम पाटील, सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील, मनोहर पाटील, नाना पाटील, राजेंद्र पाटील, श्रीराम पाटील, समाधान पाटील,बापू पाटील , छोटू पाटील, किशोर पाटील,अशोक पाटील, नंदलाल पाटील, मगन पाटील, सुदाम पाटील, लोटन पाटील, हिम्मत पाटील, शिवाजी पाटील, नामदेव पाटील सर्व रा तळवाडे यांना राग आल्याने सर्वांनी मला जात समूहातून बाहेर काढले. त्यांनी आमच्या व मानवी हक्क व नैसर्गिक तत्वानुसार असलेले सर्व रोटी व बेटी व्यवहार बंद केल्याचा आरोप केला. तसेच सामाजिक व आर्थिक पिळवणूक केली शाळा, सामाजिक कार्यक्रम स्मशानभूमी, धार्मिक कार्यक्रम मिरवणूक आदी ठिकाणी सहभागी होण्यास प्रतिबंध केला आरोपींचे समाजविघातक वर्तन कुटुंबाला जीविताला व सामाजिक राहणीमानाला घातक ठरले आहे. नुकताच भाऊबंदकीतील ६ मे रोजी झालेल्या विवाहात व ७ मे रोजीअक्षय्य तृतीयेला शरद पाटील यांना बहिष्कृत केल्याचा अनुभव आला तसेच रामकृष्ण पाटील याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी १७ जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ चे कलम ३, ४, ५,६,७ प्रमाणे जातपंचायत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.