शेंदूर्णी प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीकडून परवानगी न घेता दुसर्याच्याच नावे असणार्या जागेवर अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी दोन नागरिकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, शहरातील सिटी सर्व्हे नंबर ८८२ च्या जागेत भारतीय स्टेट बँक समोर अर्जदार नामे जुगल किशोर देवीलाल अग्रवाल (रा. शेंदूर्णी, ह.मु.पाचोरा) यांच्या मालकीची जमीन आहे. या जागेवर रघुनाथ मुरलीधर बारी व किशोर मुरलीधर बारी यांनी नगरपंचायत व संंबधीत मालकाकडून परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले. त्यांना जागा मालक व नगरपंचायतने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले व पूर्णत्वास नेले म्हणून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत नगरपंचायत तर्फे दिनेश रमेश कुमावत(लिपिक,बांधकाम विभाग) नगरपंचायत शेंदूर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विना परवानगी अनधिकृत बांधकाम नोटीस देऊनही सुरूच ठेवल्या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५४ व ५४ नुसार रघुनाथ मुरलीधर बारी व किशोर मुरलीधर बारी (रा. शेंदूर्णी तालुका जामनेर) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पो.ना.किरण शिंपी करीत आहेत.