अमळनेर (प्रतिनिधी) अमरावती विभागातील मोर्शी आगारात मागील महिन्यात अनियंत्रित बसने वाहकास चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने एका दोन वर्षीय निरागस बालिकेचे पितृछत्र हरपले होते. येथील आगारातील अधिकारी व कर्मचारीं तसेच इतर मंडळींनी सदर वाहकाच्या कुटुंबासाठी १०२८७ रुपयांची आर्थिक मदत मोर्शी आगाराकडे सुपूर्द केली आहे. येथील आगारातील वाहक मनोज पाटील यांनी संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले होते.
दि.५ फेब्रुवारी रोजी मोर्शी आगराचे वाहक प्रविण किसनराव वैराळे, (वय 30) वर्ष हे आपल्या आगारात ड्युटीची माहिती बघत असताना एस. टी. वर्कशॉप मधून निघालेल्या अनियंत्रित बसने त्यांना चिरडले होते. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी झाला होता. या घटनेत सदर वाहकाच्या पत्नीचा आधार तर दोन वर्षीय चिमुकलीचे पितृछत्र हरपले होते. मनोज पाटील यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून रा.प.म. अधिकारी व कर्मचारी यांनी सढळ हाताने मदत केली तर टॅक्सी युनियननेही पुढाकार घेऊन अध्यक्ष बंडू केळकर यांनी युनियनतर्फे एक हजार रुपये मदत दिली. तसेच येथील मूळ रहिवासी तथा हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेले अविनाश बाविस्कर यांनीही दातृत्व दाखवून पाच हजारांची भरीव अशी मदत दिली. या आवाहनातून एकुण १०२८७ रुपयांची रक्कम जमा झाली असून ही रक्कम मोर्शी आगरकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तेथून ती वैराळे यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.